कोकणातला गणेशोत्सव – एक अनुपम, कौटुंबिक सोहळा

तारामुंबरी देवगड येथील खवळे महागणपती 

कोकणातला गणेशोत्सव एक आगळा अनुभव आहे. मुंबई किंवा पुण्यातील गणेशोत्सवापेक्षा वेगळा. साधेपणा आणि भक्तिभावाने साजरा होणारा हा सुंदर गणपती उत्सव अनुभवायचा असेल तर कोकणला भेटच द्यायला हवी.

महाराष्ट्रीय माणूस उत्सवप्रिय आहे आणि महाराष्ट्रभूमी अनेकविध सणांच माहेरघर. सणांची राणी दिवाळी असो किंवा लोकप्रिय गणेशोत्सव, सारेच सण इथे उंदंड उत्साहात साजरे होतात. सर्व आबाल-वृद्ध उत्साहाने या सण-समारंभात सहभागी होतात.

कोकणात सुद्धा गणेशोत्सव भरपूर उत्साहाने साजरा होतो. इथला गणेशोत्सव साधा आणि फारसा डामडौल नसलेला असतो. कोकणातील गणेशोत्सवाच मुख्य वैशिष्ट्य हे कि इथे मुंबई-पुण्यासारखे सार्वजनिक गणपती कमीच असतात. प्रचंड आकाराच्या मूर्ती, डोळे दिपवणारा दिव्यांचा चकचकाट, कानठळया बसवणारे लाउडस्पीकर असे काही इथे अभावानेच आढळते. बाह्य भपक्यापेक्षा श्रद्धा-भावनेला आणि कौटुंबिक वातावरणाला इथे अधिक महत्व दिलेले दिसते.

कोकणातले गणपतीबाप्पा घरोघरी विराजमान असतात. बाप्पांच्या आगमनासाठी घराघरांमध्ये स्वच्छता आणि रंग-रंगोटी केली जाते. आकर्षक मखर आणि सुंदर सजावट बाप्पांच्या दैवी सौंदर्यात भर घालतात. मोठ्या थाटामाटात, झांज-ताश्यांच्या आणि गणपती बाप्पा मोरया च्या गजरात वाजत-गाजत गणेशाचे आगमन होते. मुले-माणसे आनंदाने जल्लोष करतात, फटाके वाजवतात. स्त्रिया मंगलमूर्तीचे पूजन करतात. गणेशाची मूर्ती चौरंगावर प्रतीष्ठापीत केल्यावर सर्वजण आरती म्हणतात. प्रसाद म्हणून केळी अथवा गूळ-खोबरे वाटले जाते.

उकडीचे मोदक 

उकडीचे मोदक हा कोकणातील गणपती उत्सवातला खास मेनू. तांदळाच्या पिठाच्या गोल लाट्या लाटून त्यामध्ये गुळ-खोबरयाचे चून अथवा सारण भरून उकडून केलेले हे मोदक घरोघरी दिसून येतात. एकवीस मोदकांचा नैवेद्य गणेशमूर्तीला अर्पण केला जातो. काही घरांमध्ये गव्हाच्या पीठाचे तळून बनवलेले मोदकही दिसतात. बाजारात खव्याचे मोदक, काजू मोदक, आंबा मोदक, ई. अनेक प्रकारचे मोदकही उपलब्ध असतात. मोदाकांसोबत लाडू, करंज्या सुद्धा बनवल्या जातात.

काही घरात दीड दिवस तर काही घरांमध्ये तीन, पाच, सात ते अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत पूर्ण अकरा दिवस गणपती असतो. शहरातील चाकरमानी लोक कोकणातील आपापल्या गावी येऊन घरामध्ये कुटुंबासमवेत गणपती उत्सव साजरा करण्याचा आनंद लुटतात. लोक एकमेकांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांसमोर एकत्रितपणे आरत्या म्हणतात.

देवगडमधील तारामुंबरी गावातील खवळे महागणपती हा कोकणातील प्रसिद्ध गणपती आहे. तीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या गणपतीची नोंद लिम्का बुक मध्ये करण्यात आली आहे.

नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे वातावरण अगदी सुखद आणि हिरवगार आहे. निसर्गप्रेमी लोकांसाठी अगदी आदर्श. गणेशोत्सव आणि कोकणातला पाऊस असा दोन्हीचा मनसोक्त आनंद लुटायची अगदी उत्तम संधी आहे. कोकणात कुठे राहायचे हा प्रश्न पडला असेल तर बजेट ते लग्झरी हॉटेल्स आणि रिसोर्टस तुमच्या दिमतीला आहेत.

मग काय, येणार न कोकणातला गणेशोत्सव अनुभवायला?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s